कशी बलावू रसाले...

| |

कशी बलावू रसाले
तुले सांग मायबाई..
तुह्या माहेराचा आंबा..
औंदा हसलाच नाही..!!

औंदा हसलाच नाही
मनासारखा पाऊस...
कशी होईल वं पुरी ?
काळ्या मायची हौस..!!

काळ्या मायची हौस
मिळो लेकराले दाणा..
इडा-पिडा जावो दूर
होवो पाऊस शहाणा..!!

होवो पाऊस शहाणा.. 
करो सम्दी आबादाणी..
दुष्काळाची धग जावो
फुलो हिरवी कहाणी..!!

फुलो हिरवी कहाणी..
पिक डोलत नाचावं..
भेगाळल्या भुईसाठी
फक्त इतकं मागावं..!!

-गणेश शिंदे,दुसरबीडकर.
9975767537

का इतके या जगण्याने टोकाला यावे..

| |

उचलून घ्यावे अन लगेच उधळून द्यावे..
का इतके या जगण्याने टोकाला यावे..?

कितिक परतून गेल्या दारावरून ईच्छा..
परिस्थितीने कितीवेळ उंबर्यात बसावे..?

कुठे कोवळ्या कणसाचा उरतो मागमूस..
प्राक्तन असते..उभ्या मनाने हुरडा व्हावे..!

पिक सावलीचे आता जर घ्यावे म्हणालो..
तर उन्हाच्या वादळाने 'आलोच' म्हणावे..!

-गणेश शिंदे,दुसरबीडकर...
9975767537

जगण्यासोबत समन्वयाची कला साधली नाही..!!

| |

जगण्यासोबत समन्वयाची कला साधली नाही..
जगून घेतो तरी जिंदगी जरी चांगली नाही..!!

ह्रदयावरुनी किती मोसमी वारे आले-गेले
एक सुखाची सर मुक्कामी कधी थांबली नाही..!!

जिथे झाड आंब्याचे व्हावे  तिथेच बाभुळ झालो.
नशिबामधल्या काट्यांची मग भिती वाटली नाही..!!

कुठल्याही कवितेच्या गावी जाणे जमले नाही..
आयुष्याची कविता शब्दांमध्ये  मावली नाही..!!

एका श्वासापासुन सगळे जीवन उसने असते..
तरी सत्यता कधीच तू माणसा मानली नाही..!!

-गणेश शिंदे,दुसरबीडकर..
९९७५७६७५३७

तुलाही हवी अन मलाही हवी.. (गझल)

| |

तुलाही हवी अन मलाही हवी..
जगायास थोडी नवी पालवी..!!

खरे सांग मी डाव खेळू कसा..
तुझी पावसा रे नियत पाशवी .!!

जमेना तुझ्याशी मला भांडणे..
मुळातच तुझे बोलणे लाघवी..!!

मला चंद्र मागू नये तू सखे..
इथे भाकरी भेटणे थोरवी..!!

किती बोलती भडभडूनी मला..
तुझे डोरले अन तुझी जोडवी..!!

किती काळ गेला अजुन शोधतो..
कुठे भेटते जिंदगी वाजवी..!!

जुने टाळणे सोड आता तरी..
नवी राहते गोष्ट कुठवर नवी..?? 

-गणेश शिंदे,दुसरबीडकर..
  ९९७५७६७५३७

हळवे कधीच नव्हते..(गजल)

| |

हळवे कधीच नव्हते,आभाळ हे मवाली..
झाले असेल त्याचे अलवार दुख अकाली..!!

घनगर्द सावलीशी नाते कधीच नव्हते..
फिरलो उन्हात तेव्हा ओळख जुळून आली..!!

पोटात भूक आणिक म्हणतो नको नको मी,
मुल्ये जगावयाची गरिबीतही कळाली..!!

बुद्धीबळातले मी नाही मुळीच प्यादे..
बांधून ठेवलेल्या आधीच ज्यास चाली..!! 

डोळ्यातले नको तू,टाकू पुन्हा तरल मिठ..
भाजी समन्वयाची खारट बरीच झाली..!! 

अडवू नको पिकांचे तू एवढ्यात पाणी..
त्यांची 'तहान' देवा आहे तुझ्या हवाली..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर ..
9975767537

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर...

| |

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर..
सखये मी मग मोजत बसतो दोघांमधले अंतर..!! 

सोपे नसते.कळले..!आयुष्याचे चंदन होणे..
वेढा घालुन बसलेला प्रश्नांचा नाग निरंतर..!!

येता-जाता 'तो' डोकावत असतो  विहिरीपाशी..
'भरल्या' विहिरीतुन नक्की जगण्याचा मिळतो मंतर..!!

सारवलेली मायेने स्वप्ने शेणा-मातीची..
फरशीवर त्यांना 'पुसण्या'वाचुन नाही गत्यंतर..!!

कृष्णाला पाहुन त्या पुतनेलाही फुटला पान्हा..
मग का आजमितीच्या कैक यशोदांचे स्थित्यंतर..??

-गणेश शिंदे..
दुसरबिड,बुलडाणा...
9975767537

हा देहाचा सुर्य कलू दे..(गजल)

| |

हा देहाचा सुर्य कलू दे..
आयुष्याची सांज ढळू दे..!!

इतके प्रेमळ बनव मला की ..
मी मेल्यावर दुःख रडू दे...!!

हळहळणार्या तुळशीलाही..
मुसमुसते अंगण समजू दे ..!!

काच मनाची कणखर व्हावी..
ओरखडेही 'नरम' पडू दे..!!

हट्ट मुलाचे पुरवत असता...
'माझे बाबा' परत कळू दे..!!

दे सुख नावाचे तणनाशक ..
बहर मिळू दे दुःख जळू दे..!!

-गणेश शिंदे..!!